दिल्लीच्या ‘शाहीनबाग’मधील आंदोलनाला आई आली होती 4 महिन्याच्या मुलाला घेऊन, थंडीमुळं झाला ‘मृत्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाहीन बागमध्ये आपल्या आईसह रोज आंदोलनाला येणाऱ्या 4 महिन्याच्या मोहम्मद जहान याचा थंडीमुळे मृत्यू झाला. रात्रभर आपल्या आईसोबत आंदोलनात असलेला मोहम्मद जहान अचानक थंड पडला. त्याला श्वास घेण्याचा त्रास झाल्याने मागील आठवड्यात तो मृत्यू पावला. असे असले तरी आज देखील त्याची आई विरोध प्रदर्शनात जात आहे, कारण तिचे म्हणणे आहे की हे तिच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे.

मोहम्मद जहान याची आई रोज त्याला शाहीन बागमध्ये प्रदर्शनासाठी घेऊन जात होती. तेथे तो सर्वांचा लाडका बनला होता. आंदोनलकर्ते त्याला कडेवर देखील घेत असत, त्याच्या गालावर तिरंगा झेंडा देखील काढला होता.

या मुलाचे आई-वडील मोहम्मद आरिफ आणि नाजिया बाटला हाऊसच्या परिसरात प्लास्टिकची चादर आणि कपड्यांनी झाकलेल्या एका छोट्या झोपडीत राहतात. त्यांना आणखी दोन मुलं आहेत. 5 वर्षांची मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा. हे दांपत्य यूपीच्या बरेलीचे मूलनिवासी आहेत. आरिफ येथे भरतकाम आणि ई रिक्षा चालवतो. त्याची पत्नी त्याला भरतकामात मदत करते.

मृत जहानच्या वडीलांनी सांगितले की, माझ्या मुलाच्या निधनाने आम्ही सगळं काही गमावून बसलो आहोत. त्यांच्याकडे जहानचा एक फोटो आहे आणि त्यात जहानने कॅप घातली आहे ज्यावर लिहिले आहे आय लव्ह माय इंडिया.

मुलाची आई नाजिया म्हणाली की, विरोध प्रदर्शनानंतर 30 जानेवारीला घरी आल्यावर जहान झोपेतच गेला. त्यांनी सांगितले की त्या शाहीन बागहून रात्री 1 च्या सुमारात परत घरी आल्या होत्या.

सर्वांना झोपवून मग त्या ही झोपल्या होत्या. सकाळी पाहिले तर जहान कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हता. त्यानंतर आरिफ आणि नाजिया यांनी त्याला तात्काळ अलशिफा रुग्णालयात नेले परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. नाजिया मागील 18 डिसेंबरपासून शाहीन बागमध्ये होणाऱ्या आंदोलनात सहभागी झाली होती. त्या म्हणाल्या की, थंडीमुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. रुग्णालयातून देण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कोणतेही विशेष कारण देण्यात आले नाही.