उद्या दुपारी 2 वाजता HM अमित शहा यांना भेटणार शाहीन बाग येथे आंदोलन करणाऱ्या महिला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाहीन बागशी संबंधित एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शाहीन बाग येथे आंदोलन करणाऱ्यां महिलांनी अमित शहा यांना भेटून त्यांच्यासमोर आपले मत मांडण्याचा निर्धार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या दुपारी दोन वाजता शाहीन बाग येथील महिला गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन आपले म्हणणे मांडणार आहेत. शाहीन बाग येथील आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी सीएए कायदा परत घेण्याबाबतची आहे.

कोणताही अर्ज मिळाला नाही – गृहमंत्रालय
मात्र गृहमंत्रालयाने यासंबंधी आतापर्यंत आमच्याकडे कोणताही अर्ज न आल्याची माहिती दिली आहे. शाहीन बाग येथे डिसेंबर महिन्यापासून महिला सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात धरणे आंदोलन करत आहेत.

चर्चेसाठी तयार आहोत असे म्हणाले होते अमित शहा
आम्हाला भेटण्यासाठी पंतप्रधान किंवा गृहमंत्री आले नाहीत मात्र सरकारने तीन दिवसांची मुदत दिलीय म्हणून आम्ही गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे आंदोलन करणाऱ्या महिलांनी सांगितले आहे. अमित शहा एका कार्यक्रमादरम्यान ‘आम्ही चर्चेसाठी तयार आहोत’, असे म्हणाले होते आणि येत्या तीन दिवसात कोणीही चर्चेला यावे असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

आंदोलनकर्त्यांनी मागितली सुरक्षा
शाहीन बागेत प्रदर्शन करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे की, त्यांना प्रशासनाकडून सुरक्षा हवी आहे. आम्ही शांततेत गृहमंत्र्यांना भेटायला जाणार आहोत. आमची अडवणूक करू नये. उलट प्रशासनाने आम्हाला सुरक्षा पुरवावी अशी मागणी आंदोलन करणाऱ्या महिलांनी केली आहे.