Shahrukh Khan Help : शाहरुख खाननं आपलं कार्यालय ICU मध्ये बदललं, रुग्णांना मिळणार मदत

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणू साथीच्या आजारात बॉलिवूड सेलिब्रिटींनी सरकारपासून ते गरजूंपर्यंत सर्वांना खूप मदत केली आहे. स्टार्स ने लोकांना थेट पैसे देण्याव्यतिरिक्त देखील अनेक मार्गांनी मदत केली आहे. शाहरूख खानने सुद्धा क्वारंटाईन केंद्र उभारण्यासाठी आपले कार्यालय बीएमसीला दिले आहे. शाहरुख खान आणि त्यांची पत्नी गौरी खान यांच्या या मदतीचे खूप कौतुक झाले आणि मुंबईतील खार येथील कार्यालय क्वारंटाईन केंद्रास दिल्याबद्दल बीएमसीनेही या दाम्पत्याचे आभार मानले.

आता अशी बातमी येत आहे की शाहरुख खानने आपल्या या कार्यालयाला आयसीयू मध्ये बदलले आहे, जेणेकरून गंभीर रूग्णांवर चांगले उपचार करता येतील. एका अहवालानुसार शनिवारी याचे 15 बेडच्या आयसीयूमध्ये रूपांतर झाले आहे. हे काम शाहरुखच्या मीर फाउंडेशन आणि हिंदुजा हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे केले आहे. शाहरुखने एप्रिलमध्ये आपल्या कार्यालयाची इमारत दिली होती, परंतु डॉक्टरांची कमतरता असल्याने बीएमसीने मे पर्यंत ते वापरलेले नव्हते.

त्याचबरोबर, यास आयसीयूमध्ये रूपांतरित करण्याचे काम 15 जुलैपासून सुरू झाले आणि आयसोलेटेड रुग्णांना येथे हलविण्यात आले. हिंदुजा हॉस्पिटल (खार) चे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे म्हणाले, ‘यात उच्च धोका असणारे आणि गंभीर रूग्णांसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, हाय फ्लो नोजल ऑक्सिजन मशीन आणि इतर ऑक्सिजन टॅंक ठेवण्यात आले आहेत. ही सेवा बीएमसीच्या मार्गदर्शनाखाली हिंदुजा हॉस्पिटलद्वारे चालविली जाईल.’

विशेष म्हणजे यापूर्वी शाहरुख खानने 25000 पीपीई किटची मदत देखील केली होती. शाहरुख खानने यापूर्वी सरकारी निधी आणि संस्थांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती. शाहरुख खानच्या या मदतीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अभिनेत्याचे आभार मानले, त्यानंतर शाहरुख खान म्हणाले की सर तुम्ही फक्त हुकूम करा.