‘2021 मध्ये मी तुम्हाला…;’ शाहरूखने चाहत्यांना दिली खुशखबर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियाद्वारे अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने देखील त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा त्याने एका व्हिडीओद्वारे दिल्या आहेत. शाहरूख खानने चाहत्यांवर शुभेच्छाचा वर्षाव करत एक आनंदाची बातमी देखील दिली आहे.

इन्स्टाग्राम अकांऊटवर शाहरूखने हा व्हिडीओ शेअर केला आहे. “२०२० हे वर्ष सगळ्यांसाठी त्रासदायक होतं. मला असं वाटतं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाते, तेव्हा एकच मार्ग समोर असतो आणि तो म्हणजे पुढे जाण्याचा. मी प्रार्थना करतो की २०२१ हे वर्ष सगळ्यांसाठी आनंदाचे जावो. माझी टीम सध्या माझ्यासोबत नसल्यानं मी हा व्हिडीओ स्वत: शूट केला आहे आणि २०२१ मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना मोठ्या पडद्यावर भेटेन”, असं तो या व्हिडीओद्वारे सांगत आहे.

शाहरूख यशराजच्या ‘पठाण’ या त्याच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार आहेत. तसंच या चित्रपटात शाहरुख आणि जॉन ही जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता असणार आहे.