पाकिस्तानचा ‘तो’ विश्वविक्रम विंडीजच्या सलमीवीरांनी मोडला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक वेळी कोणते ना कोणते विक्रम होत असतात. मात्र, यातील काही विक्रम हे ऐतिहासिक असतात. अशाच एका ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. वेस्ट इंडिजच्या शाई होप आणि जॉन कॅपबेल या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी ३६५ धावांची विक्रमी भागिदारी केली आहे. आज पर्य़ंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भागिदारी आहे.

वेस्ट इंडिजच्या या जोडीने केलेला हा विक्रम वनडेमध्ये सर्वोच्च विक्रम आहे. त्यांनी पाकिस्तानच्या इमाम उल हक आणि फखर जमां यांचा विक्रम मोडला. पाकिस्तानच्या या दोन खेळाडूंनी ३०४ धावांची भागिदारी रचत विश्वविक्रम केला होता. हा विक्रम आता होप आणि कॅपबेल यांच्या नावावर झाला आहे. तसेच कोणत्याही विकेटसाठीचा सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी केलेल्या ३३१ धावांच्या दुसऱ्या सर्वोच्च भागिदारीचा देखील विक्रम मोडीत निघाला आहे.

होप आणि कॅपबेल यांनी आयर्लंडविरुद्ध खेळताना ४७.२ षटकात ३६५ धावा केल्या. या भागिदारीत कॅपबेल १३७ चेंडूत १७९ धावा केल्या. यामध्ये त्याने १५ चौकारांसह ६ षटकार मारले तर विकेटकिपर आणि आक्रमक फलंदाज होपने १५२ चेंडूत २२ चौकार आणि २ षटकारांच्या मतदतीने १७० धावांची खेळी केली. या दोघांच्या विक्रमी भागिदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 50 षटकात 3 बाद 381 धावांचा डोंगर उभा केला.

पाकिस्तानचा विक्रम मोडला
वेस्ट इंडिजच्या या दोन खेळाडूंनी पाकिस्तानच्या इमाम उल हक आणि फखर जमां यांचा विक्रम मोडला. हा विक्रम त्यांनी गेल्यावर्षी जुलै महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध केला होता. यामध्ये इमामने ११३ तर जमांने नाबाद २१० धाव केल्या होत्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३०४ धावांची खेळी करत विक्रम प्रस्थापित केला होता.

गेल-सॅम्यूल्सचा विक्रम थोडक्यात वाचला
होप आणि कॅपबेल यांनी विश्वविक्रम केला असला तरी या दोघांना एक विक्रम मोडता आला नाही. या दोघांनी आणखी ७ धावा केल्या असत्या तर कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्यूल्स यांच्या नावाचा विक्रम मोडता आला असता. गेल आणि सॅम्यूल्सने २०१५ मध्ये झालेल्या झिम्बाब्वेविरुद्ध ३७२ धावांची भागिदारी केली होती.