धक्कादायक ! भोंदूबाबाने बळजबरी महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अंधश्रध्देचा गैरफायदा घेत भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार केला आहे. संगमनेर तालुक्यातील पारगाव बुद्रुक गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली आहे.

या प्रकरणी पिडीत महिलेने संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सावित्रा गडाख या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव बुद्रुक गावातील एका महिलेला गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. डॉक्टरांकडून उपचार घेण्याऐवजी अंधश्रद्धेला बळी पडत ती एका भोंदूबाबाकडे गेली. आरोपी भोंदूबाबाने महिलेला तुझ्यावर भूतबाधा झाली आहे. तुझ्या अंगातले भूत उतरावे लागेल अशी बतावणी केली. पिडीत महिलेनेही त्या मांत्रिकावर विश्वास ठेवला. मांत्रिकाचे ऐकून महिला पतीसोबत मांत्रिकाकडे भूतबाधा उतरवण्यासाठी आली. त्यावेळी या मांत्रिकाने महिलेला बळजबरी दारू पाजली अन् शेतातत नेत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर महिलेने या मांत्रिकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधत कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मांत्रिकाला अटक केली आहे.