#Video : संतापजनक ! ३७६० कोटीच्या घोटाळ्यातील ‘त्या’ हायप्रोफाइल आरोपीला पोलिसांनी ‘पार्टी’साठी नेले क्लबमध्ये

नोएडा : वृत्तसंस्था – तब्बल ३ हजार ७६० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी आणि त्याच्या पत्नीला उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी क्लबमध्ये नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्यातील आरोपी अनुभव मित्तल आणि त्याची पत्नी आयुषी यांना पार्टीला नेल्यानंतर फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने याचा व्हिडीओ व्हायरल केल्यावर प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांना पार्टीला नेणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

कोण आहे अनुभव मित्तल ?

अनुभव मित्तल हा एका सोशल नेटवर्किंग साईट एब्लेज इन्फो सोल्यूशन्सचा मालक आहे. त्याच्यावर ७लाख लोकांना ३७६० कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आऱोप आहे. याप्रकऱणी त्याला आणि पत्नीला अटक करण्यात आली होती.

अनुभव मित्तल गेला क्लबमध्ये तर पत्नी ब्यूटी पार्लरमध्ये

अनुभव मित्तल व त्याच्या पत्नीला ३ जून रोजी लखनऊ येथील तुरुंगातून फरीदाबाद न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस घेऊन गेले होते. त्यावेळी त्याला लखनऊला जायचे होते परंतु त्याला एका लक्झरी कारमधून पोलीस नोएडा येथे त्याच्या मित्रांकडे घेऊन गेले. तो नोएडाच्या सेक्टर १२१ मधील क्लियो काउंटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राकडे गेला. त्यानंतर अनुभवचा मित्र त्याला एका क्लबमध्ये घेऊन गेला. तर त्याची पत्नी महिला पोलिसांसोबत ब्यूटी पार्लरमध्ये मेकअपसाठी गेली होती.

फसवणूक झालेल्या व्यक्तीने व्हिडीओ केल्यानंतर प्रकार समोर

मित्तल हा पार्टी करत होता. त्यावेळी त्याने फसवणूक केलेल्या एका व्यक्तीने त्याला पाहिले. त्याने मित्तल पार्टी करतानाचा व्हिडीओ तयार केला. आणि तो व्हायरल केला. त्यानंतर तो व्हिडीओ आणि तक्रार मिळाल्यावर डीजीपी ओ. पी. सिंह यांनी सहा पोलिसांना निलंबित केले.