Corona Vaccine घेण्यासाठी गेलेल्या 3 महिलांना दिली Anti Rabies लस, आरोग्य विभागात प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोनाचा थैमान सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु केली आहे. मात्र असे असतानाच उत्तर प्रदेशाच्या शामली जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 9) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घ्यायला गेलेल्या 3 वृध्द महिलांना अ‍ॅन्टी रेबीज लस दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. सध्या शामलीचे डीएम जसजित कौर यांनी संपूर्ण घटनेची चौकशी सुरु केली आहे. चौकशीनंतर दोषी आरोग्य कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, कांधला येथे राहणा-या सरोज (70), अनारकली (72) आणि सत्यवती (60) या तिन्ही महिला कोरोनाची लस घेण्यासाठी शामली येथील आरोग्य केंद्रावर गेल्या होत्या. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना न विचारताच या महिलांना अ‍ॅन्टी रेबीज लस दिली. तिघींनाही लस देऊन घरी जाण्यास सांगितले. थोड्या वेळाने सरोज यांना चक्कर येऊ लागली आणि अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांनी त्यांना खासगी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांना चिठ्ठी दाखवल्यानंतर लक्षात आले की, की त्यांना कोरोना नाही तर अ‍ॅन्टी रेबीज लस दिली आहे. अन्य दोन वृद्ध महिलांनाही याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही लसीची चिठ्ठी दाखवली. यावेळी समोर आली की त्यांनाही अ‍ॅन्टी रेबीज लस दिली आहे. यातील एका महिलेची प्रकृती बिघडली असून त्या अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. वृद्ध महिलांच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर गोंधळ घातला. तसेच कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.