शरद पवार यांच्या ‘निकटवर्तीं’ नेत्याकडून ‘संचारबंदी’चे उल्लंघन, नेत्यासह 30 जणांवर FIR

सांगोला/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली असताना पाण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह 30 जणांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार दिपक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आजी-माजी लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची ही सोलापूर जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची पूजा केल्या प्रकरणी भाजप आमदारासह मंदिर समितीच्या सदस्यांवर पंढरपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी टेंभूचे उन्हाळी आवर्तनाचे चाचणीसाठी सोडण्यात येणारे पाणी प्राधान्याने जवळा आणि परिसरात सोडावे, या मागणीसाठी माजी आमदार दिपक पाटील यांनी सय्यद बाबा मठ, सोनंद, बुरुंगेवाडी, जवळा याठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. तर जवळ्याचे माजी उपसरपंचांनी जमाव जमवून आलेल्या पाण्याचे पूजन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. सोशल डिस्टंसिंग देखील पाळले नाही.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार दीपक आबा साळुखे पाटील तसेच पाणी पूजन केल्याप्रकरणी माजी उपसरपंच आप्पासाहेब देशमुख यांच्यावर भांदवी 188, 269, 270 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कयदा 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 37 (3) 135, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संजय चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे.