विस्तवाशी खेळू नका, शरद पवारांचा मोदींना प्रेमाचा सल्ला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. विस्तवाशी खेळू नका तुमचे सरकार उलथवून टाकू असे आव्हान त्यांनी मोदींना केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे खासदार धनंजय महाडिक आणि खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. फुटीरतावादी लोकांसोबत शरद पवार उभे आहेत. शरदराव तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहात, तुम्हाला हे शोभत का ? राजकारण वेगळी गोष्ट मात्र शरद पवार तिकडे शोभत नाहीत, अशा शब्दात मोदींनी पवारांवर निशाणा साधला होता. याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, संसद, घटना, रिझर्व्ह बँक, न्यायालय अशा सर्व प्रकारच्या घटनात्मक संस्थांवर हल्ला मोदी सरकारने केला आहे. असे होत असेल तर सरकार कोणासाठी चालवले जात आहे हे कळत नाही. आम्ही अन्य काहीही सहन करू मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेला हात लावलेले खपवून घेणार नाही. तुमचे सरकार उलथवून टाकू. विस्तवाशी खेळू नका, अशी मोदींवर टीका करतानाच हा आपल्याला प्रेमाचा सल्ला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राजीव गांधी यांनी देशाला विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे नेले. त्यामुळेच आज खेड्यापाड्यात महिलांच्या हातात मोबाइल दिसत आहे. गांधींच्या घरात इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यावेळी राजीव गांधी समोर आले. राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळ सोनिया गांधी पुढे आल्या. आता राहुल गांधींनी जबाबदारी घेतली आहे. गांधी घराण्याची पुढची पिढी कधीच जबाबदारी झटकत नाही. मात्र मोदी त्यांना विचारतात तुम्ही काय केले ? पण पहिल्यांदा आपण काय दिवे लावले ते सांगा. उगाचच इतरांवर आरोप करू नका अशा शब्दात शरद पवारांनी मोदींना जाब विचारला.

नरेंद्र मोदी सैनिकी कारवायांचे श्रेय घेत असल्याचा आरोपाचा पुनरुच्चार केला. मोदी ठिकठिकाणी सांगतात दहशतवाद्यांचा बंदोबस्त मीच करतो, कारण माझी छाती ५६ इंचाची आहे. अभिनंदलाही आम्हीच परत आणल्याचा दावा भाजप करत आहे. मग अडीच वर्षापासून कुलभूषण जाधव पाकिस्तानकडे आहे. त्याला का नाही सोडवल ? आता कुठे गेली तुमची ५६ इंचाची छाती असा सवाल ही पवारांनी केला.