पुण्यातील ‘कोरोना’ची स्थिती का बिघडतेय ? काय चुकतंय ? शरद पवारांनी घेतली अधिकार्‍यांची ‘शाळा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळं या दोन्ही शहरांची चिंता वाढली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडत आहे, कुठे काय चुकत आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत चर्चा केली. जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी, प्रशासकीय गलथानपणा याबाबतही शरद पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शाळा घेत त्यांची चांगलीच कान उघडणी केली.

बारामती हॉस्टेलवर झालेल्या या बैठकिला शरद पवार यांच्यासह केंद्रीय नेते प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या का वाढतेय असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला. पत्रकार मृत्यू प्रकरण, त्याचबरोबर जम्बो कोविड सेंटरबाबत का त्रुटी आहेत, याबाबतही विचारणा करत त्यांनी सूचना केल्या. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांची तातडीनं बैठक बोलावली. कोरोनाबाबत पुण्यात स्थिती का बिघडतेय याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

सौरभ राव काय म्हणाले ?
देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पण अधिक आहे. चाचण्यांचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

वरिष्ठ संपादकांसोबत शरद पवार बैठक घेणार
शनिवारी (दि.5) पुणे शहर, पुणे ग्रामीण, पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्यात येणार आहे. शनिवारी दिवसभरात चार बैठका घेण्यात येणार आहेत. कोरोनाबाबत काय चुकतंय, काय रणनिती असावी यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शरद पवार हे विविध वृत्तपत्रांच्या वरिष्ठ संपादकांसोबतही बैठक घेणार आहेत.