शरद पवारांनी शेतकर्‍यांना दिला वेगळा ‘मंत्र’, म्हणाले – ‘अन्य क्षेत्रांमध्ये कसं काम करता येईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ५१ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमिनी आहेत आणि त्या दोन हेक्टर पेक्षा कमी शेतीवर कुटुंबातील पाच माणसे अवलंबून आहेत. एवढ्या लोकांना जगवण्याची मोठी ताकद ही शेतीत असते. शेतीऐवजी अन्य क्षेत्रात कसे काम करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे असे मत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात मांडले.

आता शेतीवरील ओझे कमी करण्याची गरज असून, त्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीनेच शेती केली पाहिजे. देशातील लोकसंख्येचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. भारत देशात ५८ ते ६० टक्के लोकं शेती करतात. शेतीला सर्वात मोठी समस्या भेडसावत असेल तर ती आहे पाण्याची. ४४ ते ४५ टक्के शेती ही खात्रीशीर पाण्यावर होत असते. सर्वात जास्त धरणे आणि पाण्याचा साठा महाराष्ट्र राज्यात आहे. गहू आणि तांदूळ ही पिके पंजाब मध्ये घेतली जातात. उत्तर प्रदेश आणि हरियाणात देखील हीच स्थिती आहे. दक्षिण भारतात भाताची दोन ते तीन पिके घेतली जातात.

अन्नधान्य ही देशाची गरज आहे. त्यासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असून कोणती राज्ये अन्न – धान्य उत्पन्नासाठी योग्य आहेत त्याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र चा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्यात कापसावर आधारित उत्पादन वाढेलेले आहे. या प्रकारे शरद पवारांनी शेतीवर आधारित आपले मत मांडले आहे.