WB Elections : शरद पवारांनी काँग्रेस अन् भाजप विरोधी पक्षांची बांधली मोट, ममता बॅनर्जींसाठी घेणार प्रचारसभा

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अनेकजण सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध नेते ममता बॅनर्जी यांच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. आता महाराष्ट्रात तसेच लोकसभेत काँग्रेससोबत लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बंगालमध्ये ममतांना पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार स्वत: तिथे प्रचारसभा घेण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस डाव्यांच्या साथीने वेगळी लढत आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांना भाजपाबरोबरच काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीविरोधात लढावे लागणार आहे. यामुळे केंद्रात आघाडी असलेल्या विरोधी पक्षांनी ममता यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी काही आठवड्यांपूर्वी भाजपाविरोधात बंगालमध्ये आघाडीची मोट बांधणार असल्याचे विधान केले होते. परंतू त्यानंतर दोन तीन दिवसांत काँग्रेसने डाव्यांच्या साथीने वेगळी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. यामुळे पवारांच्या प्रयत्नांना सुरुंग लागल्याचे दिसू लागले होते. परंतू पवारांनी बंगालमध्ये भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधली आहे. यात त्यांचा राष्ट्रवादी पक्ष, झारखंड मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन, सपाचे अखिलेश यादव राजदचे तेजस्वी यादव यांचा सहभाग आहे.

पश्चिम बंगालची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मानली जात आहे. त्यांना कडवी टक्कर देण्यासाठी पवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पवारांना आता भाजपाबरोबरच काँग्रेस-डाव्यांविरोधातही लढावे लागणार आहे. ही अनोखी युती ममता यांच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. दुसरीकडे ममतांना झालेला अपघात की घातपात यावर वातवरण तापल्यास त्याचा फटकादेखील भाजपाला बसण्याची शक्यता आहे.