शरद पवार, नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी समारोप सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर उपस्थिती असणार आहेत. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थेने या कालखंडात वार्षिक संकल्पित आराखड्यानुसार आपली उद्दिष्ट्ये पूर्ण केली आहेत. त्यामुळे पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

संस्थेचा आज रौप्य महोत्सवी समारोप सोहळा होत असून यानिमित्ताने बहादूरशेखनाका येथे सहकार भवन वास्तूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच पवनतलाव मैदानात ध्यासपर्व पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे असणार आहेत. तसेच माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यासह सहकारमंत्री सुभाष देशमुख, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच माजी जलसंपदा मंत्री आमदार सुनील तटकरे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक व अध्यक्ष सुभाष चव्हाण व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी केले आहे.

समाजातील विविध घटकांसाठी काम करीत असताना कोणताही भेदभाव न दाखविता सर्व समाज घटकातील गोरगरीब, आर्थिक दुर्बल, छोटे-मोठे व्यावसायिक यांना त्यांच्या गरजेनुसार संस्थेने आधार देण्याचे काम केले आहे. अत्यंत तत्पर व सुलभ पध्दतीने अर्थसहाय्य करताना आपली माणसे आपली संस्था हे संस्थेचे ब्रीदवाक्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. तसेच संस्थेने ठेव योजनेबरोबरच शेतीपुरक दुग्ध व्यवसाय, ग्रामीण घरकुल योजना राबवून अनेकांच्या घरांची स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावला आहे. याचबरोबर गेली २० वर्षे १५ टक्के लाभांश देणारी परिसरातील ही एकमेव संस्था आहे, असे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव आणि प्रशांत यादव म्हणाले.