राष्ट्रवादीची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू ; शरद पवारांनी ‘या’ तारखेला बोलाविली महत्वाची बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत आली आहे. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकाही जवळ येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर  शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईत पक्षाची बैठक बोलावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.  त्यासाठी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी मुंबईत पक्षाच्या आमदार, लोकसभेचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत घडलेल्या घटनांचाही आढावा घेतला जाणार आहे.

पवारांची दुष्काळ दौऱ्याला सुरुवात –

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी लोकसभेसाठीचं मतदान संपताच दुष्काळ दौऱ्याला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सोलापुरातील सांगोला इथं भेट दिली. यावेळी त्यांनी चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.

ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे. गेल्या वेळी १८ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. त्यामुळे यावेळेसही सप्टेंबरमध्येच विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.