Sharad Pawar : ‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा केंद्राचा ‘तो’ निर्णय तात्काळ मागे घ्यावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे शेतीचे कामे सुरू असली तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. वी. सदानंद गौडा यांना खतांच्या वाढलेल्या किंमती विरोधात ट्विटच्या माध्यमातून एक पत्र लिहिले आहे.

एकीकडे कोरोना महामारीने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर खतांच्या वाढलेल्या किंमतीवरून आता शरद पवार आक्रमक झाले आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे. केंद्राचा हा निर्णय अतिशय धक्कादायक असून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. तसेच या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.