सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ? – शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुशांत सिंग प्रकरणावर आता शरद पवार यांच्याकडून भाष्य करण्यात आले आहे. सुशांतसिंगच्या आत्महत्या प्रकरण बाजूला राहिलं आणि बाकीच्याच गोष्टी समोर येत आहे. चौकशी करणाऱ्या यंत्रणा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत का? अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली आहे. आमच्या वाचण्यात आलं होत कि एका कलाकाराने आत्महत्या केली आणि त्याचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र केंद्र सरकारचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही म्हणून त्यांनी हा तापास दुसऱ्या एजन्सीकडे देण्यात आला.

या एजन्सीने काय दिवे लावले त्याचा प्रकाश काही आम्हाला बघायला मिळालेला नाही. त्यामुळे हे सगळं भलतीकडेच चालू आहे. सत्य कधी बाहेर पडेल तेव्हा समजेलच असेही शरद पवार म्हणाले आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जूनला त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर बॉलिवूडच्या कंपूशाहीमुळे त्याचा बळी गेला आहे अशी टीका सगळीकडून करण्यात येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने सुशांतनी आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला आहे असे वक्तव्य केले आहे. तसेच घराणेशाही आणि कंपूशाही यामुळे सुशांतला आत्महत्या करावी लागली असेही कंगना रणौत म्हणाली. या संदर्भातल्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून त्याचा तपास सुरु केला. मात्र या गोष्टीवरून राजकारण चांगलंच रंगलं. त्यानंतर भाजपने केलेल्या मागणीनुसार हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.

जेव्हा हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला तेव्हा बॉलीवूड आणि त्यांचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं. या ड्रग्स कनेक्शनमध्ये दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सिमोन खंबाटा, सारा अली खान या बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. त्यानंतर एनसीबीकडून ह्या सगळ्यांची चौकशी सुरु करण्यात आली. या बाबतीत शरद पवार याना विचारले असता “सुशांत सिंहची आत्महत्या राहिली एका बाजूला आणि इतरच गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणा मूळ मुद्द्यापासून लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत का? अशी शंका घेण्यास जागा आहे” असे वक्तव्य शरद पवार यांच्याकडून करण्यात आले आहे.