अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांचे वक्तव्य, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तासंघर्षाला अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत वेगळे वळण दिले. भाजपला पाठिबा देऊन स्वत: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राजकीय भुकंप आला होता. मात्र, शरद पवारांच्या संयमी खेळीने अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान अजित पवार शपथ घेतील आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, शपथविधी सोहळ्यात त्यांना संधी मिळाली नाही.

अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन लवकरच सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांचा समावेश करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस हिवाळी अधिवेशनानंतर विचार करेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

राज्यात भाजप-शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्रीत येत राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यामध्ये तीनही पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी अजित पवार मंत्रीपदाची शपथ घेतील अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना शपथ देण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे यासाठी पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे गळ घातली होती. मात्र, आता अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय हिवाळी अधिवेशनानंतर होणार हे निश्चित झाले आहे.

Visit : policenama.com