शरद पवारांकडून भाजपाला ‘आव्हान’, म्हणाले – ‘अशा खूप कारवाया पाहिल्या, काय करायचंय ते करा’

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – ईडीच्या नावाने काय कारवाई करायची ती करा,  अशा खूप कारवाया पाहिल्या, काय करायचंय ते करा अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपा सरकारला  थेट आव्हान दिले आहे. इस्लामपूर – वाळवा मतदारसंघातून काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी हे विधान केले आहे.

सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की , ‘मी शिखर बँकेचा डायरेक्टर किंवा सभासद नसतानाही ईडीच्या गुन्हेगारी यादीत माझं नाव आलं. आमच्या बापजाद्यानेही कधी गुन्हेगारी केली नाही. शिखर बँकेत 70 जणांचा समावेश आहे. त्यात भाजपा, सेना यांचीसुद्धा लोक आहेत. ईडीच्या नावाने काय कारवाई करायची ती करा त्याची चिंता आम्हाला नाही, अशा खूप कारवाया पाहिल्या आहेत. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की खटला चालवा. गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,हे निर्देश सुप्रीम कोर्टाला द्यावे लागतात आणि आम्ही गुन्हेगार नसताना ईडीत आमचे नाव येते, ही दडपशाही नाही का? राजकारणात विरोधकांना नाउमेद करण्याचे काम होत आहे. ‘

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीनं शरद पवारांसह 70 नेत्यांवर गुन्हा दाखल केल्यामुळे  मागील आठवड्यात राजकीय वातावरण तापले होते. बँकेशी काहीही संबंध नसताना गुन्हा दाखल झाल्यानं पवार यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला होता. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती म्हणून कायदा आणि सुरक्षाव्यवस्था यामुळे पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचे टाळले होते.

Visit : Policenama.com