आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, शरद पवारांची ‘या’ नेत्यावर टीका

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल ? अशा शब्दात शरद पवार यांनी मोहिते पाटलांवर टोकाची टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यावर नातेपुते येथील सभेत वैयक्तिक पातळीवर टीका केली.

अकलूजचा दहशतवाद हा गल्लीबोळात दहशतवाद असून तो संपवण्यासाठी मी तुमच्या भागात आमदाराप्रमाणे काम करेन असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. आपल्या जुन्या सहकाऱ्यांवर कधी आकसाने बोलणार नाही असे म्हणत पवारांनी विजय शुगर आणि सुमित्रा पतसंस्थांच्या घोटाळ्याबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगून थेट मोहिते पाटील पिता-पुत्रावर टीका केली.

मोहिते पाटील यांना रणजीतला सत्ता द्यायची होती, आम्ही विधानपरिषदेवर आमदारकी आणि नंतर राज्यभेतली खासदारकी दिली. मात्र, जिल्ह्यात फिरुन इतर तालुक्यात याने उद्योग सुरु केल्याच्या तक्रारी आल्याने त्यांना लोकसभेला नाकारले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मोहिते पाटलांचा हा पोरगा कधी मुख्यमंत्री, तर कधी गिरीश महाजन यांच्या घरासमोर तासनतास उभा रहात होता. इतकी वर्षे सत्ता भोगलेल्याला तसे इतरांच्या दारात उभे राहणे शोभतं का असा सवाल शरद पवारांनी केला.

दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंग हीने केलेल्या शहीद करकरे यांच्याबाबतच्या विधानाचा तीव्र निषेध शरद पवारांनी केला. राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा आता एका राष्ट्रीय पक्षाला कवडीचा अधिकार राहिला नसल्याचे सांगत पवारांनी भाजपचा निषेध केला.

You might also like