अहो मोदी आम्ही विरोधी पक्षात आहोत याची आठवण ठेवा : शरद पवार

तासगाव : पोलीसानामा ऑनलाईन – लोकसभांच्या प्रचारासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढाकार घेत सभांमध्ये मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेली पाच वर्षे सत्तेच्या गादीवर हे आणि शेतीसाठी काय केलं याची आम्ही उत्तर द्यायची. अहो मोदी आम्ही विरोधी पक्षात आहोत याची आठवण ठेवा, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली. सांगली लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी तासगाव येथे सभा घेण्यात आली होती. तिथे शरद पवार हे सभेला संबोधित करत होते.

भाजपाला सत्तेची इतकी मस्ती आली आहे की, त्यांचे प्रदेशाध्यक्ष दानवे हे ‌शेतकर्‍यांना साले म्हणत आहेत तर दुसरीकडे प्रवक्ते अवधूत वाघ हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस बोलत आहेत आणि हेच त्यांच्याकडे मते मागायला जात आहेत, यांना मते मागायला लाज कशी वाटत नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला आहे.

महाराष्ट्रात प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. त्यावरही पवार यांनी निशाणा साधला आहे.  महाराष्ट्रातल्या या सभांमध्ये मोदी कधी सांगतात पवारांच्या घरात भांडणे सुरु आहेत तर कधी पवारांचे पुतण्याने अधिकार काढून घेतले. अहो, मोदी आमची चिंता कशाला करताय. हा एकट्यादुकट्याचा राष्ट्रवादी पक्ष नाही हा जनतेच्या आशिर्वादाने उभा राहिलेला पक्ष आहे, असं शरद पवारांनी यावेळी नमुद केले. तसंच सांगली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचं नातं अतूट आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. हा वणवा आता पेटल्याशिवाय राहणार नाही, असंही पवार यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, भाजपकडे जाहिरातींसाठी पैसा आहे, मात्र आमच्याकडे नाही. त्यामुळे त्यांच्या तोंडातून माझी फुकट प्रसिद्धीच होत आहे, हे चांगलेच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.