शरद पवारांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकर्‍यांबद्दल कवडीची आस्था नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना दोन महिन्यापासून आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्च्याच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी एकत्र आले आहेत. आज (२५ जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यातील शेतकरी आंदोलनासाठी एकवटले आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संबोधित केले.

शरद पवार म्हणाले, “ही लढाई सोपी नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. आपण पाहत आहात, ६० दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का?,” असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, भाकपचे नेते कॉम्रेड नरसय्या आडाम, मुंबई काँग्रेस प्रमुख भाई जगताप, अबू आझमी यांच्यासोबत महाविकास आघाडीतील व शेतकरी संघटनेशी संलग्न अनेक नेते उपस्थित होते.

पोलीस आंदोलकांमध्ये झाली झटापट

दरम्यान, आझाद मैदानात नेत्यांची भाषणे झाल्यावर शेतकरी नेते अजित नवले, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि सचिन सावंत आदी नेते मोर्चेकऱ्यांसोबत राजभवनाकडे निघाले होते. त्यांच्यासोबत हजारो मोर्चेकरी लालबावटे घेऊन राजभवनाकडे निघाले. अचानक मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने पोलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ शेतकऱ्यांना अडवलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.