शिवाजी महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीच्या ‘अधीन’ झाले नव्हते, शरद पवारांचा उदयनराजेंना ‘टोला’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये, नुकताच उदयनराजे भोसले यांनी आपल्या खाजदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. या आधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही अखेर उदयनराजे भाजपच्या गोटात सामील झाले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हा प्रवेश रुचलेला दिसत नाही.

उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी टीका केली होती. त्यांचं भाजपमध्ये जाणं राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का होता. त्यामुळे शरद पवार यांनी शिवाजी महाराजांचं उदाहरण देत उदयनराजेंना जोरदार टोला लगावलाय. नवी मुंबई येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.

महाराज हे स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वराच्या आधीन झाले नव्हते, त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतून रयतेचे राज्य निर्माण केले होते. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी पुन्हा नवा महाराष्ट्र घडवूया असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावेळी केले.

महाजानदेश यात्रा काल साताऱ्यात दाखल झाली होती. भाजपकडून सध्या जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जातंय याची प्रचिती महाजनादेश यात्रेतून पहायला मिळतीय. मुख्यमंत्री मात्र, त्यांनी केलेली कामे न सांगता यात्रेतून फक्त विरोधकांची निंदा नालस्ती करण्यात व्यस्त असल्याचे सांगत यावेळी पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीवर उदयनराजे काय म्हणाले ?

महाजनादेश यात्रा काल साताऱ्यात दाखल झाली, यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उदयनराजे सुद्धा होते. यावेळी झालेल्या सभेत उदयनराजेंनी राष्ट्रवादीवर चांगलीच टीका केली. ते म्हणाले, नैतिकता म्हणून मी खासदारकीचा राजीनामा दिला. आता नव्याने मतदारांचा कौल घेणार. राष्ट्रवादी माझा बँड वाजविण्याचा विचार करत असेल तर मी आत्ताच सांगून ठेवतो. माझा बँड कोणीही वाजवू शकणार नाही. माझा बँड मीच वाजवणार हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीला दिला.

गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारने माझं एकही काम केलं नाही. सगळे प्रस्ताव अडवून ठेवले. मात्र गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी अनेक कामं मार्गी लावली असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.