PM मोदींच्या भेटीवरील खुलाशाबाबत भाजपचे शरद पवारांवर ‘टीकास्त्र’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदी यांच्या बैठकीतील गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने शरद पवारांच्या कौटुंबीक कलहासह भ्रष्टाचारावरून टीका केली होती. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर भाजप नेत्यांनी गप्प राहणे पसंत केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काहीतरी हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा असल्याची चर्चा सुरु असतानाच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी घेतलेला निर्णय वैयक्तीक असल्याचे सांगत त्याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना भेटल्यावर 15 दिवसांनी खुलासा का केला हे पहिल्यांदा सांगितले पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. मोदींसोबतची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असल्याचे पवार म्हणाले होते. मी विदर्भातल्या दुष्काळी दौऱ्यावरून आलो होते. मलाही त्यांना भेटायचं होत त्यामुळे मी भेटलो, असे पवार यांनी सांगितले होते. मात्र, मोदींनी त्यांना असा कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता, गैरसमज निर्माण करण्यासाठी खोटे बोलत असल्याचा आरोप भंडारी यांनी केला.

Visit : policenama.com