6 वर्षात शरद पवारांची संपत्ती 60 लाखांनी वाढली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी मार्च अखेर निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात 7 जागांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी मुंबईमध्ये विधानभवनात आपला अर्ज भरला. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार यांनी आपल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. यामध्ये मागील सहा वर्षात शरद पवार यांच्या संपत्तीत 60 लाखांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

एवढी आहे शरद पवारांची संपत्ती
उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात शरद पवार यांनी आपली 32.37 कोटी रुपयाची एकूण मिळकत जाहीर केली आहे. यामध्ये 25,21,33,329 रुपयाची जंगम आणि 2,52,33,941 रुपयाची स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

शरद पवारांकडे 1 कोटीचे ऋण
शरद पवार यांनी शपथपत्रामध्ये आपल्याकडे 1 कोटी रुपयाचं ऋण असल्याचे नमून केले आहे. प्रतिभा पवार यांचा अ‍ॅडव्हान्स डिपॉझिट म्हणून 50 लाख रुपये मिळाल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून शेअर ट्रान्सफरसाठी हे पैसे मिळाल्याचे शपथपत्रात त्यांनी म्हटले आहे. तसेच हिंदू अविभाजीत कुटुंब नियमाप्रमाणे त्यांना अ‍ॅडव्हान्स डिपॉझिट म्हणून नातू पार्थ अजित पवार यांच्याकडून 50 लाख रुपये मिळाल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.

2014 मध्ये होती एवढी संपत्ती
2014 च्या राज्यसभा निवडणूकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात शरद पवार यांनी 20,47,99,970.41 रुपयाची जंगम मालमत्ता आणि 11,65,16,290 रुपयाची स्थावर मालमत्ता अशी एकूण 32.13 कोटींची संपत्ती जाहीर केली होती.