… शरद पवारांची इच्छा असेपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार चालेल

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. परिणामी, महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. दरम्यान, या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत सूचक विधान केले आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार शरद पवार यांनी आणलं आहे. जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी त्यांची इच्छा नसेल तेव्हा सरकार कोसळेल, असा दावा अनिल गोटे यांनी केला आहे.

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. याबाबत अनिल गोटे यांनी नाराजी व्यक्त केली. हा निकाल आपल्याला अपेक्षित होता. अमरिश पटेल यांनी धनशक्तीच्या बळावर हा विजय मिळवला आहे. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटली याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार करावा, असे आवाहनही अनिल गोटे त्यांनी केले.

महाविकास आघाडीच्या सरकारला तीन पक्षांचं सरकार काय म्हणता. केंद्रात अटलबिहार वाजपेयींचं २३ पक्षांचं सरकार होतं, पण ते पडलं नाही. मग हे तीन पक्षांचं सरकार का पडणार. भाजपाचे नेते काहीही म्हणतील. मी भाजपात राहिलोय. संघ, जनसंघ, भाजपा सर्व पाहिलंय. हे सरकार शरदचंद्र पवार यांनी आणलं आहे. जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी त्यांची इच्छा नसेल तेव्हा हे सरकार कोसळेल. भाजपाचे नेते पहिल्या दिवसापासून हे सरकार पडेल म्हणून सांगत आहेत. मात्र असं सांगता सांगता एक वर्ष निघून गेलं. अशीच चार वर्षे जातील. सत्तेच्या सिमेंटने पक्ष एकत्र झालेले असतात, असे सरकार पडत नाही. विधान परिषद निवडणुकीतील निकालांचा महाविकास आघाडीच्या भवितव्यावर परिणाम होणार का, यावर उत्तर देताना अनिल गोटे म्हणाले.

You might also like