एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारांचे ‘संकेत’ !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. कालच त्यांनी अधिकृत भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त वा-यासारखे पसरले होते. मात्र स्वतः खडसे यांनी यावर मौन बाळगल्याने राजकीय चर्चा रंगत आहे. मात्र खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खासदार शरद पवार यांनी संकेत दिले आहेत.

पवार म्हणाले,. खडसे यांचे भाजपच्या उभारणीत मोठ योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने खडसे प्रखरतेने दिसून येत होते. पण त्यांची नोंद घेतली गेली नाही,असे त्यांना वाटते. त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते, असे ते म्हणाले. पक्ष सोडलेल्यांना परत घेण्याबाबत पवारांनी गेलेत तेथे सुखी रहा, असा संदेश दिला.

खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त रविवारी झळकले. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याचा इन्कार केला. पाटील म्हणाले खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते भाजपमध्येच राहतील,असा मला विश्वास आहे. मी प्रदेशाध्यक्ष आहे. मला त्यांचा राजीनामा मिळाला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिल. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौ-यावर असताना पत्रकारांनी त्यांना खडसे यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी चक्क हात जोडले होते. तसेच मला याची काही माहिती नसल्याचे ते म्हणाले होते.

ती ऑडिओ क्लिप व्हायरल
खडसे यांना भाजपच्या राष्ट्रीय कायर्कारिणीत स्थान न मिळाल्यांने त्यांचे समर्थक नाराज होते. त्यापैकी एका समर्थकांने थेट फोन करून राष्ट्रवदी प्रवेशासंबधी विचारणा केली. त्यावर अगोदर तिकडून प्रस्ताव तरी येऊ द्या. ते आपल्याला मानाच स्थान देणार का, याची खात्री करूनच प्रवेश करू असे खडसेनी म्हटले होते. ती क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

खडसे पक्षांतर करणार नाहीतः फडणवीस
एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्या सोबत राहिले पाहिजे, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते त्यामुुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवारांकडून चाचपणी
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांची बैठक घेत खडसेंच्या राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशाबाबत चाचपणी केली. तेंव्हापासून खडसे यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरु होती. मात्र मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या सा-या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तरी जाणार नाहीत, ना अशी चर्चा रंगली आहे.