पक्षांतर्गत गटबाजी मिटवण्यासाठी शरद पवार माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर 

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन – पक्षांतर्गत गटबाजी उफाळली असल्याने आपण माढ्यातून उमेदवारी करत आहेत असे शरद पवार यांनी वेळोवेळी दर्शवून दिले आहे. शरद पवार यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करत गटबाजीला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला आहे.

माढा मतदारसंघातील करमाळ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शरद पवार अकलूजला जाणार आहेत. अकलूजमध्ये महाशिवरात्र यात्रे निमित्त भरणाऱ्या कृषी प्रदर्शनाचे उदघाटन शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. त्या ठिकाणी हि शरद पवार कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

‘मोहिते पाटील गटाच्या विरोधात माढाचा शिंदे गट’ अशी सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. या गटबाजीत राष्ट्रवादीची मोठी हानी होत असल्याचे दिसते आहे.राष्ट्रवादीतील गटबाजीमुळेच सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादी मोठा पक्ष असून देखील राष्ट्रवादीला विरोधात बसण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीतील एक गट भाजपला मदत करत असल्याचे चित्र सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात पाहण्यास मिळते आहे. त्या सर्व गटबाजीला संपवून शरद पवार यांना लोकसभेची निवडणूक लढायची आहे.