कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशी आयोग शरद पवारांची ‘साक्ष’ नोंदवणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांनी ही माहिती दिली. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष घेण्याची मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी आयोगाकडे केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. त्यानंतर आयोगाने यावर शरद पवार यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. न्या. जे.एन.पटेल म्हणाले, शरद पवार यांना कोरेगाव भीमा प्रकरणात साक्ष नोंदवण्यासाठी बोलण्यात येईल.

यामुळे शरद पवारांची चौकशीची मागणी ?
शरद पवार यांनी मागील आठवड्यामध्ये एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणात पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावे घेतली होती. तसेच कोरेगाव भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात.

या विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील भेट दिली होती. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी फिरून वातावरण वेगळे केल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे ? याबाबत तातडीने साक्ष घेण्याची मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी केली होती.