Lockdown दरम्यान शरद पवारांना आली आपल्या मित्राची आठवण, सांगितला बाळासाहेब आणि उध्दव ठाकरे यांच्यातील फरक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. एकीकडे कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असतानाच देश या महामारीचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्याच्या घडीला देशात आठ लाखांच्या वरती रुग्ण आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याच लॉकडाऊनच्या दोन महिन्यांमध्ये बाळासाहेबांची आठवण आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलची माहिती दिली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची प्रदीर्घ अशी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रथम भाग आज प्रदर्शित करण्यात आला आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी कोरोना संसर्ग परिस्थिती, लॉकडाऊन आणि राज्यातील राजकारण यावरती भाष्य केलं आहे. तेव्हा बोलताना त्यांनी आपल्या मित्राची आठवण देखील सांगितली आहे. “कोरोना आणि लॉकडाऊन मुळे पहिले दोन महिने स्वस्थपणे घरात बसून होतो. बाळासाहेबांच्या कामाची पद्धत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. ते काय दिवसभर घराच्या बाहेर पडून कुठे गेलेले असायचे असे नाही. अनेक वेळेला ते दिवस दिवस घरातच घालवायचे, पण ते घरात असताना देखील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहित करुन आलेल्या परिस्थितीला कस तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी शिकवलं होतं असं मला वाटतं.” असं म्हणत त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

तर, ‘माझ्यासारख्याला या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण अशासाठी येत होती की, आपण घरातून तर बाहेर पडायचं नाही, पण बाकीची काम, ज्या दिशेने आपल्याला जायचंय त्या दिशेला जाण्याचा प्रवासाची तयारी आपण केली पाहिजे. ते ज्या पद्धतीने बाळासाहेब करायचे त्याची आठवण या काळात आली’ असं सुद्धा पवार यांनी म्हटलं.

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक

‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असं काहींना वाटत असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्रांच्या स्वभावाला साजेसा असा हा त्यांचा निर्णय आहे. म्हणजे निर्णय घ्यायचा, मात्र अत्यंत सावधगिरीने. निर्णय जाहीर केल्यानंतर दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करुन घेता येईल तेवढी करुन घायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत हा फरक आहे आणि तसा तो राहणारच, असं मत पवार यांनी दोन्ही नेत्यांबद्दल बोलताना व्यक्त केलं.

‘बाळासाहेब हे प्रत्यक्ष सत्तेत सहभागी नसले तरी सत्तेच्या पाठीमागे एक मुख्य घटक होते. त्यांच्या विचाराने सत्ता महाराष्ट्रात आली हे महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं. आज विचाराने सत्ता आली नाही, पण सत्ता प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या संबधीची जबाबदारी आताचे मुख्यमंत्री ठाकरे यांची आहे. हा फरक महत्वाचा आहे.’ असं निरीक्षक देखील पवार यांनी यावेळी बोलताना नोंदवलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like