अजित पवार यांच्या पाठोपाठ शरद पवारही ‘नॉट रिचेबल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनी आपला व सचिवाचा मोबाईल बंद केला असून ते ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ काल रात्रीपासून शरद पवारही ‘नॉट रिचेबल’ झाले असून रात्री पुण्यातून निघालेले शरद पवार मुंबईतील आपल्या सिव्हर ओक या घरी परतलेले नाही.

आपल्यामुळे शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांना त्रास झाला, या कारणावरुन व्यथित होऊन अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा शुक्रवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यानंतर ते मुंबईतून बाहेर पडले. त्यांनी आपला व बरोबर असलेल्या सचिवाचा मोबाईलही बंद ठेवला आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर थांबल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याची खात्री कोणीही देत नाही.

या घटनेनंतर शरद पवार यांनी शुक्रवारी रात्री पुण्यातील मोदीबाग येथे पत्रकार परिषदेत घेतली. अजित पवार यांनी राजीनामा देण्याविषयी आपल्याला काही सांगितले नाही. त्यांचा मुलगा पार्थ पवार याच्याकडून माहिती घेतली असे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा शरद पवार हे पुण्यातून मुंबईकडे जाण्यास निघाले. मात्र, ते रात्री सिव्हर ओक या बंगल्यात पोहचलेच नाही. आज सकाळपर्यंत ते कोठे आहेत, याची काहीही माहिती समोर आलेली नाही. ते मुंबईतील घरी सकाळी १० वाजता येतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, ते कोठे गेले याची माहिती नसल्याचे सांगण्यात येते.

शरद पवार यांनी पुण्यातून निघाल्यानंतर अज्ञात स्थळी अजित पवार यांची भेट घेतली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शरद पवार हे मुंबईच्या घरी आल्यानंतर काय सांगतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.