‘पवार साहेब, पार्थवर इतका राग CBI चौकशीच्या मागणीचा की राम मंदिराचे समर्थन केल्याचा ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. यानंतर पार्थ यांच्या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दात पवारांनी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनीही आता या प्रकरणावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवार यांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांसमोर मत प्रदर्शन करणाऱ्या शरद पवार यांनी व्यक्त केलेला राग हा नक्की कशाचा होता याचा खुलासा करावा अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थने राम मंदिराला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून ? निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्वत:च्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारलं वाचून व ऐकून धक्का बसला, एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितलं. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थने राम मंदिराला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून ? असा खोचक सवाल त्यांनी शरद पवार यांना विचारला आहे.