प्रकाश आंबेडकरांचे शरद पवार हे ‘पंतप्रधान’ होण्याबाबतचे मोठे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भरिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे पंतप्रधान होण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार हे पंतप्रधानपदासाठी योग आहेत असे अजिबात वाटत नसल्याचे परखड मत व्यक्त केले. तसेच ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे देखील या पदावर विराजमान होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर एच.डी. देवेगौडा हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर हे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे सांगत भाजपाला १५० ते २०० जागा मिळतील असा अंदाज त्यांनी यावेळी बोलून दाखवला. मध्यंतरी शरद पवार, मायावती, ममता बॅनर्जी या तिघांपैकी कोणीतरी पंतप्रधान होईल अशी चर्चा होती. तर राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेनन यांनी शरद पवार पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचे म्हटले होते. या सर्व चर्चांबाबत बोलताना प्रकाश आंबडेकर यांनी यापैकी एकही जण पंतप्रधान होणार नाही. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील पंतप्रधान होऊ शकत नसल्याचे म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात असे मत व्यक्त केले होते. तसेच निकालानंतर एनडीएतले काही घटक पक्ष महाआघाडीसोबत येतील असेही पवार म्हटले होते. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी हे सगळे अंदाज खोडून काढले.