शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलंच नाही, काही तरी म्हणून खालच्या पातळीचं राजकारण नको

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरं फोडली. यात गोपीनाथ मुंडेंचं घर फोडून पुतण्याला बक्षीस दिलं अशी टीका राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवारांवर केली होती. त्याला राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

क्षीरसागर यांच्या आरोपांना उत्तर देताना आव्हाड म्हणाले आहेत की, ‘क्षीरसागर यांनी इतिहासाचा विपर्यास करू नये, पवार यांनी मुंडे यांच घर फोडलं नाही, त्याचा साक्षीदार मी होतो. बीडच्या राजकारणात मुद्दाम वेगळं वातावरण निर्माण करण्यासाठी जयदत्त क्षीरसागर अशी विधाने करत आहेत. त्यांनी खालच्या पातळीचं राजकारण करू नये.’

काय म्हणाले होते जयदत्त क्षीरसागर
बीडमधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात जयदत्त क्षीरसागर म्हणाले होते की , ‘पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरं फोडली. यात गोपीनाथ मुंडेंचं घर फोडून पुतण्याला बक्षीस दिलं. असं राज्यात अनेकांच्या बाबतीत घडलं आहे. पवारांनी दुसऱ्याला आदेश देण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावं.

राष्ट्रवादीत माझी कोंडी केली होती. ते फोडण्याकरता मी सेनेत गेलो आहे. पक्षात असतानाच पवारांना विचारायचं होतं की 15 वर्षांत त्यांनी काय केलं. मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी जे काम या युती सरकारने केले ते काम आघाडी सरकारने केलं नाही. दुर्दैवाने राष्ट्रवादीत मतभेद असायला पाहिजे होते मनभेद नाही. याकरणामुळे मोठ्या प्रमाणत लोक पक्ष सोडून चालले आहेत. भाकरी फिरावयची तर दुसरीकडे फिरवा. जिथे फिरवायची तिथे फिरवत नाहीत नको तिथे फिरवत बसतात. त्यामुळे राष्ट्रवादीवर ही वेळ आली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीची घसरगुंडी थांबवणं अवघड आहे. लोकांमधे मानसिकता झाली. कार्यकर्ते नैराश्याने ग्रासले आहेत. पक्षांतर करणारे चौकशी किंवा पदाच्या आशेने जात नाहीत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्रासाला कंटाळून चालले आहेत. यामुळे काळ ठरवेल चूक काय आणि बरोबर काय.’

Visit : policenama.com