जनाची नाही तर मनाची हे वाक्य पवारांच्या तोंडी तरी शोभते का ? : विनोद तावडे

मुंबई : प्रतिनिधी – गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला. ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला. जनाची नाही तर मनाची हे वाक्य पवारांच्या तोंडी तरी शोभते का ? असे तावडे म्हणाले.

शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना तावडे पुढे म्हणाले, शरद पवार यांचे विधान अतिशय धक्कादायक असून, नक्षल्यांचे बोल ते का बोलत आहेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. गडचिरोलीची घटना ही निषेधार्हच आहे. त्याचा करावा तितका निषेध कमी आहे. पण, लगेच शरद पवार गृहखातं, मुख्यमंत्री, जनाची नाही तर मनाची अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करीत आहेत.

बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती. त्यावेळी विधिमंडळात त्यांचा राजीनामा मागण्यात आला होता. छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात भाजपच्या आमदाराचा मृत्यू झाला. त्यावेळी हेच शरद पवार गप्प का होते ? केवळ छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असून तेथे त्यांचा मुख्यमंत्री आहे म्हणून ? काँग्रेसने देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्या निर्णयाला आपण याचसाठी का समर्थन दिले, असा प्रश्नही विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.