आता ‘कर्जमाफी’बद्दल पवारांची भाषा बदलली

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता राष्ट्रवादी आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सराकरकडे पैसा नाही, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कर्जमाफीबाबत शरद पवारांची भाषा बदलल्याची टीका त्यांना यावेळी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात राजू शेट्टी उपस्थित होते. यावेळी सोमवारी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेत त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन शेतकऱ्यांना संकटमुक्त करण्याचे साकडे घातले.

यावेळी शरद पवारांवर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी दिलेले आश्वसान पाळण्याऐवजी नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारवर अवलंबून राहू नये असे विधान त्यांनी केले. त्यामुळे राज्यातील शेतकरी नाराज होऊन सातबारा कधी कोरा करणार याच्या प्रतिक्षेत आहेत.

परंतु परिस्थिती अशी आहे की नाबार्डच्या निधीतून शेतकऱ्यांना बँकेमार्फत दिलेले कर्ज फेडण्यासाठी प्रतिवर्षी 30 जून ही तारीख असते. प्रत्येक शेतकरी आपले कर्ज वेळेत फेडून बँकेतील आपले क्रेडिट खराब होऊ देत नाही. याचा गैरफायदा सरकार घेत आहे. धनदांडगे शेतकरी अथवा व्यापार करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका बोलावून घेऊन कर्ज देतात आणि आपले टार्गेट पूर्ण करतात, अशा बँकांना सामान्य शेतकऱ्यांना कर्ज देण्याची सक्ती सरकारने केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सरकारवर टीका करताना शेट्टी पुढे म्हणाले, गरजू शेतकऱ्यांना बँक दारामध्ये उभे राहू देत नाहीत ही वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातबारा कोरा झाल्याशिवाय स्वस्थ बसू देणार नाही, हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा आहे. शरद पवार यांच्या विधानाकडे लक्ष वेधून त्यांनी दोन्ही सरकारकडून शेतकऱ्याला धुडकावले जात आहे, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी रविकांत तुपकर, विलास पाटील आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी उपस्थितांना संबोधित केले.