शरद पवारांची बळीराजाशी केली ‘मन की बात’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार यांनी आज तुळजापूरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. कांकाब्रा ते सास्तुरा दरम्यान शरद पवार यांना तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवावी लागली. या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली.

तेव्हा लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. या शेतकऱ्यांच्या हातात पावसात भिजल्यामुळे वाया गेलेली पिके होती. ही पिके शेतकऱ्यांनी शरद पवार यांना दाखवली. आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळे ती वाया गेली. त्यामुळे आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असे शेतकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या नुकसानीची नीट माहिती द्या, अशी सूचना शेतकऱ्यांना दिली.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राज्य परीवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी युवकचे महेबुब शेख, प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील नांदुरीकर, संजय निंबाळकर, कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन सुनिल चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, आदीत्य गोरे, तारेख मिर्झा, संजय दुधगावकर, अमित शिंदे, गोकुळ शिंदे, माजी नगरसेवक धनंजय पाटील, महेंद्र धुरगुडे आदी उपस्थित होते.