विधानसभेसाठी राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू : शरद पवार

शरद पवारांचे वृत्तवाहीनीच्या मुलाखती दरम्यान संकेत

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा न करता सत्ताधारी सरकारविरोधात राज्यात विविध ठिकाणी राज ठाकरे यांनी सभा घेतल्या. या सभांमुळे त्यांचे राजकीय वजन वाढलं आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत युती करणार नसल्याची घोषणा पंढरपूरच्या सभेत केली होती. मात्र, आपली भूमिका बदलत त्यांनी लोकसभेच्या तोंडावर युती केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला तडा गेला असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. बाळासाहेबांविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम रहायचे. ते आपला शब्द पाळायचे. बाळासाहेबांचे तेच प्रतिबिंब आज राज ठाकरे यांच्यामध्ये दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरेंच्या सभांना तरुण पीढीचा आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मिळत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरे यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागणार आहे. राज ठाकरे यांच्यासोबत आमची चर्चा झालेली नाही.

मात्र राज ठाकरेंना आम्ही दुर्लक्ष करू शकत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेचे राज्यातील सरकार घालवण्यासाठी जी समीकरणे जुळवावी लागती, त्याचा विचार केला जाईल. अशारीतीने विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्याचा गांभीर्यानं विचार सुरू असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले.