निवडणूक संपताच शरद पवारांची दुष्काळग्रस्त गावांना भेट

अजनाळे, येलमार मंगेवाडी गावातील शेतकऱ्यांशी सवांद

सांगोला : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत. काल मुंबईत मतदान केल्यानंतर शरद पवार थेट सोलापूरला रवाना झाले. त्यांनी आज (मंगळवारी) सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी आणि डाळींबामुळे प्रकाश झोतात आलेले महाराष्ट्र राज्यातील ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजनाळे येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, अजनाळे गावचे सरपंच विजय येलपले, मंगेवाडी गावचे उपसरपंच चंद्रकांत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका शेतकऱ्याने तक्रार केली, फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश आहे, सरसकट जनावरांना प्रवेश मिळावा, अशी विनंती शेतकऱ्याने केली.

रोज पंधरा किलो चारा मिळतो, मात्र जनावरांना अधिक चारा मिळावा. दोन हजार लिटर दूध संकलन होतं. त्या यलमार मंगेवाडी गावात आता दूध संकलन दोनशे लिटरवर आले आहे, अशी स्थिती गावकऱ्यांनी पवारांना सांगितली. गावातील पोरं बाहेर शिक्षणाला किती आहेत, अशी विचारणा पवारांनी शेतकऱ्यांकडे केली. दुष्काळामुळे शिक्षणात अडथळा येत असेल तर मदत करण्याबाबत प्रयत्न करु, असं पवारांनी सांगितलं.