उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा एकदा दुरावल्याने शरद पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्व पक्षांमध्ये तयारी सुरु आहे. मात्र राष्ट्रवादीमधील राजेंच्या घराण्यातील वादामुळे राष्ट्रावादी बुचकळ्यात पडली आहे. साताऱ्यातील दोन्ही राजेंमधील वाद जगजाहिर आहे. खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्यातील वाद काही काळासाठी मिटतात काही काळानंतर पुन्हा डोकं वर काढतात. आता पुन्हा त्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत.

दोन्ही राजेमधील वाद हे राष्ट्रवादीसाठी मोठी समस्या बनत आहेत. त्यांच्यातील वादामुळे शिवेंद्रराजे राष्ट्रवादी सोडण्याच्या मनःस्थितीत आहेत, अशी चर्चा आहे. दोन्ही राजेंना भेटून पुन्हा एकदा त्यांच्यातील वादावर तोडगा काढण्याची तयारी शरद पवार यांनी केली आहे. यापूर्वीही शरद पवार यांनी दोन्ही राजांमधील वितुष्ट संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकांवेळी शिवेंद्रराजेंच्या समर्थकांनी उदयनराजेंना विरोध केला होता. तेव्हा शिवेंद्रराजेंनी समर्थकांना साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्यातील वादही अधिक वाढले होते.

दरम्यान, साताऱ्यात राष्ट्रावादीच्या विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतींना शिवेंद्राराजेंनी दांडी मारली होती. आधीच दोन्ही राजेंमधील वादामुळे शिवेंद्रराजे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. त्यात त्यांनी मुलाखतीला मारलेल्या दांडीमुळे आता या चर्चांना अधिक उधान आले आहे. शिवेंद्रराजेंनी पक्षात राहावे म्हणून तसंच दोन्ही राज्यांमधील वाद संपावेत म्हणून शरद पवार पुन्हा एकाद मध्यस्ती करणार आहेत.