शिवसेनेचं नेमकं चाललंय काय ?, शरद पवारांनी तातडीने घेतली CM ठाकरेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि.19) पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा अधिकृत तपशील मात्र देण्यात आलेला नाही. मात्र, या भेटीत राज्यातील कोरोना संसर्गाची सध्यस्थिती, केंद्राने संसदेत सादर केलेली कृषी विधेयकं आणि राज्यात कळीचा बनत चाललेला मराठा आरक्षणाचा प्रश्न या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या बैठकिनंतर पवार तसेच मुख्यमंत्र्यांच्या वतीने कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी, या बैठकीला अनेक कारणांनी महत्त्व प्राप्त झाले आहे. पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात अनेक प्रमुख मुद्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील कोरोना स्थितीचा धावता आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्याचवेळी मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. याबाबत पुढे कोणती भूमिका घ्यायची व कायदेशीर लढाईची दिशा कशी असावी, याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात बहुतेक सर्व पक्षांनी एकजुटीने लढा पुढे नेण्याचा निर्धार केला. मात्र, त्याचवेळी मराठा समाज मात्र आक्रमक झाला आहे. राज्यात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडताना दिसत असताना या संपूर्ण स्थितीवर चर्चा करताना सरकारच्या विचाराधीन असलेल्या तीन पर्यांवरही या दोन नेत्यांमध्ये खल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यसभेत शिवसेना कोणती भूमिका घेणार ?

केंद्र सरकारने संसदेत मांडलेल्या कृषी विधेयकांना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून तीव्र विरोध होत आहे. लोकसभेत ही विधेयकं संमत करुन घेण्यात सरकारला यश आलं असले तरी राज्यसभेत मात्र बहुमताचा आकडा नसल्याने सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे लोकसभेत या विधेयकांच्या बाजूने शिवसेनेने आपलं मत टाकलं असताना राज्यसभेत शिवसेनेची भूमिका काय असणार हे महत्त्वाचे आहे. राज्यसभेत या विधेयकांना शिवसेना व राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळावा म्हणून या दोन्ही पक्षांशी वरिष्ठ पातळीवरुन संपर्क साधण्यात येत असल्याचे वृत्त आहे. हे पाहता पवार-ठाकरे भेटीत या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

विधेयकाला आमचा आक्षेप – पवार

खुद्द पवार यांना यासंदर्भात विचारले असता अशी चर्चा झाली किंवा नाही, यावर ते काहीच बोलले नाहीत. आमच्या पक्षाने या विधेयकावर सभात्याग करुन नाराजी व्यक्त केली आहे. कृषी हा राज्यांशी निगडीत विषय आहे आणि राज्यांच्या सहमती शिवाय केंद्राने हे महत्त्वाचे विधेयक संसदेत आणले, याला आमचा आक्षेप असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like