शरद पवार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर, रोहित पवारांच्या मिरवणुकीत 30 JCB तून 8000 किलो गुलाल उघळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे वयाच्या ऐंशीतही ओला दुष्काळ दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे त्यांचे नातू आणि नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार हे विजयी मिरवणुकीत लाखोंचा गुलाल उधळताना दिसत होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाची नासाडी झाल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले. हवालदिल शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार सातारा आणि नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत तर त्यांचे नातू जामखेडच्या विजयी मिरवणुकीत व्यस्त असल्याची दोन वेगवेगळी चित्र पहायला मिळाली.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 43 हजार मतांनी विजयी झालेले शरद पवार यांचे नातू आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांची आज विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये 30 जेसीबीच्या सहाय्याने लाखोंचा 8 हजार किलो गुलाल उधळण्यात आला. विधानसभा निकालानंतर शरद पवारांनी विद्यमान आमदारांना ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहा, असा सल्ला दिला होता. कदाचीत या सल्ल्याचा विसर रोहित पवार यांना पडला असावा अशी चर्चा सुरु झाली आहे. रोहित पवार यांनी आजोबांच्या सल्लाच उधळला असे बोलले जात आहे.

राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी हवालदील झाला आहे. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. त्यांचे डोळे पुसत आहेत. उद्धवस्त झालेल्या शिवारांची पाहणी करत आहेत त्याच वेळी त्यांचा नातू रोहित पवार गुलालात माखल्याचे दिसत आहेत. रोहित पवार यांच्या मिरवणुकीसाठी शहरातील मिरवणुक मार्गावर 30 जेसीबी आणि 10 क्रेन आणले होते. अहमदनगर रोडवरील विश्रागृहापासून सुरु झालेली मिरवणूक तीन किलोमीटर वर असलेल्या बाजार समितीजवळ थांबली.

Visit : policenama.com