शरद पवारांची राष्ट्रवादीच्या आमदाराची तातडीची बैठक, नुकसानग्रस्त भागाचा घेतला आढावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात परतीच्या पावसाने (heavy rain) धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar MLA Meeting) यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि नुकसानग्रस्त भागातील आमदार उपस्थित असून त्यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची माहिती शरद पवार घेत आहेत.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर आमदारही उपस्थित आहेत.

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहा:कार माजवलाआहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक डोळ्यादेखत वाहून गेलं. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. सध्या राज्यात सर्वपक्षीय नेते मंडळी नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांपासून ते सरकार आणि विरोधी पक्षातील नेते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यादरम्यान, कुठल्या भागात किती नुकसान झाले. कुठले पंचनामे झाले, कुठले नाही याबाबतचा आढावा घेत आहेत.