बारामती: Sharad Pawar News | राष्टवादीत बंड झाल्यानंतर शरद पवारांनी आपले राजकीय डावपेच टाकत लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ खासदार निवडून आणले. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याच बारामती विधानसभा (Baramati Assembly Election 2024) मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मोठे लीड मिळाले होते.
त्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार शिरूर मतदारसंघातून (Shirur Assembly Election 2024) लढणार अशी चर्चा होती मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर ते बारामती मधून लढणार यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान आता अजित पवार यांच्या विरोधात या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी रणशिंग फुंकले आहे. युगेंद्र पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
शरद पवार म्हणाले, “आम्हाला महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडून हे प्रश्न सोडवले गेले नाहीत. अलीकडच्या काळात पक्षफुटी, पक्षांची मोडतोड करणे, सत्तेसाठी नको ती तडजोड करणे, विचार आणि कार्यक्रमाशी तडजोड करणे, हे ज्या घटकांनी महाराष्ट्रात केलंय, त्यांच्याविषयी आम्ही जनतेसमोर जाऊन भूमिका मांडणार आहोत.
जनतेला परिवर्तनासाठी तयार करण्याची आमची भूमिका आहे. मी मविआच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की, महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करणारा, शेतकरी, महागाई, बेरोजगारी, कामगारांचे प्रश्न, दलित, आदिवासी, महिला यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमची आघाडी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल”, असे शरद पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,” मविआची जागावाटपाची प्रक्रिया सुरु आहे. काही जागांवर मविआतील दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या जागांबाबत निर्णय न झाल्याने आम्ही दोन्ही पक्षांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप अवकाश आहे.
आघाडीत अशाप्रकारे चर्चा करण्यासाठी आवश्यकता असते. मविआत बहुसंख्य जागेसंबंधी एकमत झाले आहे. थोड्या जागांचा प्रश्न आहे. त्यामधून आम्ही निश्चित मार्ग काढू”, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.