‘कोरोना’ आजाराबाबत सजग रहा : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गजन्य आजाराचे प्रमाण पुण्यासह अन्य भागात कमी होत असले तरी हिवाळ्यात दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सध्या रुग्णांची संख्या झपाट्याने घटत असल्याने नागरिकांमध्ये जागरूक रहाण्याबाबत शिथिलता येण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशवासीयांशी संवाद साधून कोरोना संपलेला नाही असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रविवारी पुण्यात बोलताना कोरोनाबाबत जागरुक रहा असा सावधगिरीचा इशारा दिला.

अमेरिका, इटली आणि स्पेन आदी देशांमध्ये गेल्या आठ दिवसांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बातम्यांमधून कळते आहे. त्यामुळे आपल्याला आणखी सजग आणि जागरूक रहाण्याची तसेच आणखी साधन सामग्री उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे असे पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पंचशील फाउंडेशन यांच्यावतीने पुणे शहरासाठी सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रुग्णांना संकटातून बाहेर काढण्यासाठी या रुग्णवाहिकांचा चांगला वापर करता येईल असे पवार म्हणाले. पंचशील फाउंडेशनने आयसीयू बेड्सही रुग्णालयांना उपलब्ध करुन दिले आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी आमदार सुनील टिंगरे, अविनाश साळवे, रवि माळवदकर आदी उपस्थित होते.