सत्तास्थापनेबाबत शरद पवारांचं मोठं विधान, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला धक्का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभेचे निकाल लागल्यानंतर देखील अद्याप राज्यामध्ये सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेनेने घेतलेल्या मुख्यमंत्री पदाच्या भूमीकेमुळे राज्यात सत्तास्थापना होण्यास विलंब लागत आहे. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच ठरले नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या उत्तरामुळे युतीमधील तिढा आणखीनच वाढला आहे.

शिवसेनेने आमच्याकडे दुसरे पर्य़ाय खुले आहेत असे म्हणाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांनी प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असेही पवारांनी स्पष्ट केल्याने हा शिवसेनेला एक प्रकारे धक्काच मानला जात आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज लागला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. आयोध्या निकालावरून राज्यातील राजकारण बदलणार नाही. लोक दोन-तीन दिवसांत विसरून जातील असे शरद पवार यांनी सांगितले.
राज्यातील सरकार स्थापनेबाबत विचारले असता पवार म्हणाले, पुन्हा एकदा सांगतो… बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. युतीला जनतेने कौल दिला आहे. प्रभावी विरोधी पक्ष ही आमची जबाबदारी आहे.

वडिलकीच्या नात्याने युतीला सल्ला देताना शरद पवार म्हणाले, एक वडील म्हणून माझा सल्ला आहे. कुणी कुणाला खोटं ठरवू नये. 30 वर्षे ते एमकमेकांसोबत आहेत. शिवसेनेबरोबर जाण्यासंबंधी चर्चा सुरू आहे का, यावर पवार म्हणाले, सेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार आम्ही अद्याप केलेला नाही. आम्ही अजून याची चर्चाही केलेली नाही. राज्यपाल काय करतात ते आम्ही बघतो. लवकरात लवकर स्थिर सरकार राज्यात येणं आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Visit : Policenama.com