मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar On Chhagan Bhujbal | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे सात दिवस बाकी असल्याने जोरदार प्रचार सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. ‘पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवारांनी केले’, असे म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीकेची तोफ डागली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
छगन भुजबळ म्हणाले, ” १९९१ मध्ये शिवसेना फोडण्याच पुण्यकर्म शरद पवार यांनीच केले. मी शिवसेना फोडू शकत नव्हतो. ३६ लोकांची स्वाक्षरी झाल्यानंतर मी शेवटी स्वाक्षरी केली. कुठलाही दोष नसताना मला तेलगी प्रकरणात गोवण्यात आले अधिकाऱ्यांमधील वाद होते. मला राजीनामा द्यायला लावला”, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले, ” ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की, छगन भुजबळ आणि त्यांचे काही सहकारी त्या पक्षात अस्वस्थ आहेत आणि बाहेर पडायच्या नादात आहे. संपर्क साधू इच्छितात. जरूर आम्ही संपर्क साधला आणि त्यामध्ये चुकीचे काही नाही”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले, ” मी कोणत्या पक्षात होतो? मी शिवसेनेत नव्हतो. त्यामुळे माझी जबाबदारी काय? मी आमचा जो विरोधी पक्ष आहे, त्याला शक्ती द्यायचं काम माझं आहे की, त्याला कमकुवत करण्याचं काम माझं आहे?”, असा उलट प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.