मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar On Gautam Adani And Amit Shah Meeting | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. ” २०१९ च्या विधानसभा निकालानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार आणण्यासाठी गौतम अदानींच्या घरी अमित शहा, शरद पवार, प्रफुल पटेल (Praful Patel), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बैठक झाली. या बैठकीला मी देखील उपस्थित होतो”, असा दावा अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्याआधी घडलेल्या घटनांबाबत केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली.
“भाजपा-राष्ट्रवादी सरकार स्थापन झालं का? जर असं काही केले असते तर सरकार बघायला मिळालं असते. प्रत्यक्ष असं काही राज्य स्थापन केले का? मग नसताना असे प्रश्न काढायचे कशाला?”, असं सांगत अमित शहा आणि गौतम अदानी यांच्यासोबत झालेल्या भेटीवर माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी खुलासा केला आहे.
शरद पवार म्हणाले, गौतम अदानी नव्हे तर मी अनेकांच्या घरी जातो. रतन टाटा असो वा किर्लोस्कर यांच्याही घरी जातो. आजही जातो. अदानी यांची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आहे. आणखी काही प्रकल्प काढण्याचा अदानींचा विचार आहे. महाराष्ट्रातील त्यांची गुंतवणूक जेव्हा मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा गोंदिया भंडारा परिसरात त्यांनी प्रकल्प सुरू केले त्याचे उद्घाटन मीच केले होते.
त्या भागात कोळशाच्या खाणी विकसित करण्याचा विचार होता. त्यात त्यांनी लक्ष घातलं. केंद्र सरकारने ते काम त्यांना दिले. त्यावेळी भाजपा सरकार नव्हते. ते काम त्यांनी पूर्ण केले. त्याचे काही कार्यक्रम होते तेव्हा मी स्वतः गोंदियाला गेलो होतो. त्यामुळे जे महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात काम करू इच्छितात अशांच्या कामांना गती देणे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे या गोष्टी राज्य म्हणून गरजेच्या असतात”, असे शरद पवार यांनी म्हंटले.
ते पुढे म्हणाले, ” अजित पवारांनी सांगितलेली एकही गोष्ट सत्य नाही. निवडणुकीचा कालावधी सोडल्यानंतर कधीही केंद्रातले मंत्री असो वा उद्योजक भेटत नाहीत असं मी कधी म्हणणार नाही. अजित पवारांना सोबत घेऊन मी अनेकदा भेटी घेतल्या आहेत जेणेकरून त्यांना माहिती व्हावी, त्यांना कळावं यासाठी करत असेन.
देशाचे गृहमंत्री यांना मी एकदा काय, तीन-चार वेळा भेटलो असेल. शिष्टमंडळ घेऊन भेटलोय. महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचे काही प्रश्न होते, त्याबाबत त्यांना भेटलो, त्यांच्या घरी जाऊन भेटलो. शेवटी मी सार्वजनिक जीवनात काम करतो. संसदेचा सभासद आहे.
मतदारसंघातील, राज्याचे काही प्रश्न पुढे येतात त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ज्यांच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे गरजेचे असते. संवाद ठेवणे, भेट घेणे यातून काही कारस्थान होतंय असं म्हणण्यात काही अर्थ नाही”, असा खुलासा शरद पवार यांनी केला आहे.