उस्मानाबादच्या ‘या ‘दिग्गज कुटुंबाला आता राष्ट्रवादीत ‘नो-एन्ट्री’, शरद पवारांनी केलं स्पष्ट

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पवारांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक असलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना घरवापसीसाठी काही निकष आहेत. मात्र, उस्मानाबाद मधील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची दार बंद झाली असल्याचं म्हणत ‘दिल्या घरी सुखी राहा,’ अशा शब्दांत पवारांनी पाटील कुटूंबाला आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

अतिवृष्टीग्रस्त नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळी वार्ताहरांनी त्यांना भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेश बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील परिवाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादी सोडून गेले, ते परत राष्ट्रवादीत येऊ इच्छित आहेत असा प्रश्न केला असता, त्यासंदर्भात पक्षाने काही नेत्यांबाबत निर्णय घेतला आहे. त्यामध्ये उस्मानाबादच्या नेत्याचं नाव न घेता त्यांना राष्ट्रवादीत आता एन्ट्री नसल्याची पवारांनी जाहीर केलं.

तत्पूर्वी, अहमदनगरच्या श्रीरामपूर येथे वार्ताहरांनी शरद पवार यांनी जवळचे नातेवाईक पक्ष सोडून जात असल्या संदर्भात विचारले होते, तेव्हा उत्तर देताना पवार चांगलेच संतापलेले दिसले. नेते पक्ष सोडून जात आहेत, कार्यकर्ते नाही. नातेवाईक आणि राजकार राजकारण याचा संबंध नसल्याचं पवार यांनी म्हटलं होते.

पवार आणि पाटील परिवाराचे संबंध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून उस्मानाबादचे नेते पद्मसिंह पाटील हे पवारांसोबत आहेत. शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी आजवर ओळख होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून पवार आणि पाटील यांच्या संबंधात एक मोठी दरी निर्माण झाली आहे.