सातारा लोकसभा कोण लढवणार? शरद पवार यांनी दिले हे उत्तर 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील महत्वाची जागा म्हणून सातारच्या लोकसभा मतदारसंघाकडे पहिले जाते. सातारा लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाणार या प्रश्नाचे उत्तर स्वतः शरद पवार यांनी मागील काळा पासून अवघड बनवले आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोधक निर्माण करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. मागील काही महिन्यापासून सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना कोल्हापूरात पत्रकारांनी प्रश्न विचारला आहे.

शरद पवार आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांना सातारा मतदार संघातून कोणाला उभे केले जाणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या चाणाक्षवृत्तीचा परिचय दाखवून दिला आहे.  आपल्या पक्षाचा सातारा मतदारसंघातून उमेदवार कोण असणार आहे असे विचारले असता त्यांनी कोल्हापूर आणि सातारा मतदारसंघाचे उमेदवार निश्चित केले आहेत असे उत्तर देऊन शरद पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली आहे.

सातारा मतदार संघातून उदयनराजे भोसले तर कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी मागेच सांगितले आहे.  स्वपक्षातील आमदारांचा विरोध स्वीकारून शरद पवार पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी उदयराजेंना देणार आहेत. आता मात्र घोषणा कधी होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान कोल्हापूर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आघाडीवर देखील भाष्य केले आहे. राहुल गांधी यांच्या सोबत आपली आघाडीवर चर्चा झाली असून राज्याच्या राजकारणात आघाडीतील जो पक्ष मोठा होईल तो पक्ष मुख्यस्थानी राहील यावर एक मत झाले आहे असे शरद पवार यांनी म्हणले आहे.